मित्राच्या हत्येप्रकरणी तिघे अटकेत

कल्याण : तीन वर्षांपूर्वी केलेल्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगून परतलेल्या गुन्हेगारांना ज्याची हत्या केली, त्याच्या मित्राकडून बदला घेतला जाण्याची भीती वाटत होती. या भीतीतून या तिघांनी त्या मित्राचीदेखील हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

दीड वर्षांपूर्वी बच्ची उर्फ संतोष यादवसह त्याच्या साथीदारांनी बबलू चौरसिया याची हत्या केली होती. बबलूचा मित्र असलेला आकाश मोहिते याच्यावरदेखील संतोषचा राग होता. त्यातच बबलूची हत्या केल्यानंतर आकाश या हत्येचा बदला घेईल, अशी भीती संतोष आणि त्याच्या मित्रांना वाटत होती. यामुळेच गुरुवारी रात्री ११च्या सुमारास खडेगोळवली परिसरातून घरी जात असलेल्या आकाशला संतोष, माटू उर्फ धीरज सिंहसह वैभव गणेचार (१८) याने अडवले. 'तू माटूकडे का बघतोस,' अशी विचारणा करत आकाशला शिवीगाळ केली. त्यावेळेस संतोष आणि धीरज सिंग या दोघांनी आकाशवर चाकूहल्ला चढवला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या आकाशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सुमीरन सादरा यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष यादव, माटू उर्फ धीरज सिंग आणि वैभव गणेचार या तिघांना अटक केली.