बदलापूर पश्चिम भागातील एकाच इमारतीतील चार रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले असतानाच बदलापूर गावातील एकाच इमारतीत तब्बल १२ रहिवाशांना डेंग्यूसदृश्य तापाने गाठले आहे. तर या परिसरात डेंग्यूची लागण झालेले एकूण २५ रुग्ण असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे.
शहरात साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची भिीती व्यक्त होत असतानाच बदलापूर गावातील पॉप्युलर आर्केड या इमारतीत डेंग्यू सदृश्य तापाचे १२ रुग्ण आढळल्याने या इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच बदलापूर गावात डेंग्यूसदृश्य तापाचे एकूण २५ रुग्ण परिसरातील एका डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका इमारतीत एवढे रुग्ण असतील तर शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शेकडोवर गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे कुठलीही अधिकृत माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना औषधफवारणीचा केवळ दिखावा केला जातो का असा प्रश्न आहे. तसेच शहरात साथीचे आजार पसरू नये यासाठी औषध फवारणी होत असेल तर या औषधांच्या गुणवत्तेविषयी राष्ट्रवादीचे कालिदास देशमुख यांनी शंका उपस्थित करत औषध खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
डेंग्यूचा धसका