रेल्वे रुळालगत सापडले ३६ लाखांचे मोबाइल

कल्याण वालधुनीदरम्यान असलेल्या रेल्वे रुळावरील गस्तीदरम्यान महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी नोकिया कंपनीचे १९४ नवे कोरे सुमारे ३६ लाख रुपये किमतीचे मोबाइल जप्त केले. हे सर्व मोबाइल नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नोकिया कंपनीच्या गोदामातून चोरी केलेले मोबाइल असल्याचे चौकशीत उघड झाले.

रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील किमती सामान चोरणाऱ्या चोरट्याविरोधात रेल्वे पोलिसांनी पोलिस आयुक्त रवींद्र शेनगावकर यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणे निश्चित केली आहेत. कल्याण वालधुनी दरम्यान असलेल्या ठिकाणावर गस्ती घालत असताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना कल्याणकडून वालधुनीच्या दिशेने रुळांमधून चार अज्ञात तरुण चालत येत असताना दिसले. या तरुणांवर संशय आल्याने जवानांनी त्यांना हटकताच त्यांनी पकडले जाण्याच्या भीतीने हातातील बॅग टाकून पळ काढला. या बॅगेत नोकिया कंपनीचे १८ हजार रुपये किमतीचे १९४ मोबाइल सापडले. तपासादरम्यान हे सर्व मोबाइल भिवंडीमधील गोदामातून चोरल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे पोलिस या चोरट्याचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत आहेत.